जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात कारागृहात असलेले आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांचा जमाव महावितरणच्या कार्यालयात गेला होता. यावेळी त्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांना पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे आणखी ३१ जणांना ठेऊन घेणे गैरसोयीचे होणार होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांतर्फे एकत्र जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. काल आमदार मंगेश चव्हाण यांच्या जमीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती. तर आज न्यायालयाने त्यांच्यासह इतर सर्वांना जामीन मंजूर केला आहे.