जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । जळगाव महानगपालिकेच्या आरोग्य विभागातील कायम कर्मचाऱ्यांना ढकल गाड्या, गमबूट यासह इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, दसरा, दिवाळी या सणामुळे वार्डात, परिसरात निघणारा ओला व सुका कचरा निर्माण होणार आहे. हा कचरा उचलून ने-आण करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. आरोग्य विभागातील कायम कर्मचाऱ्यांकरीता २०० ते २५० ढकल गाड्या, गमबूट, झाडू व इतर साहित्य त्वरित खरेदी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. साहित्य खरेदी करून दिल्यास कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कचरा संकलन करण्याचा भार येणार नाही. तसेच दैनंदिन साफसफाई करतांना होणार मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.