जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । जामनेर तालुक्यातील हॉटेलमधून देशी-विदेशी दारु चोरणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील गाडेगाव नेरी येथील शशिप्रभा हॉटेल अज्ञात चोरट्यांनी मंगळवार, दि.१९ एप्रिल रोजी मध्यरात्री फोडून दुकानातील १ लाख १० हजार २२५ रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल चोरून नेला होता.
याबाबत हॉटेलचा मॅनेजर शिवाजी दौलत पवार यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील गुन्हेगार जळगावात असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. मच्छीमार्केट सुप्रीम कॉलनी आणि सागर लक्ष्मण वाधवाणी (वय-२०) रा. बाबानगर, सिंधी कॉलनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून एकुण मुद्देमालापैकी ५४ हजार ५६७ रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला.
या गुन्ह्यात अजून तीनजण असून त्यांचा शोध सुरू आहे. यातील संशयित आरोपी दिनकर उर्फ पिण्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध ठिकाणी एकुण १६ गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयित आरोपींना जामनेर पोलीस ठाण्याचे पो.ना. अतुल पवार, राहुल पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.