जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज गुरुवारी आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
म्युन्सीपल कॉलनीतील प्रसिद्ध मृत्यूंजय हनुमान मंदिरात महायुतीचे उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, सिंधूताई कोल्हे, माजी महापौर ललित कोल्हे आणि संतोष पाटील यांनी दर्शन घेऊन विजयाचा संकल्प केला. त्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी स्वतः प्रत्येक गल्लीत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

ही रॅली म्युन्सीपल कॉलनी, जुने भगवान नगर, अंबिका सोसायटी, मुंदडा नगर आणि भूषण कॉलनी या भागांतून काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी रॅलीचे स्वागत करत आमदार भोळे आणि उमेदवारांचे औक्षण केले. यावेळी मतदारांच्या चेहऱ्यावरील उत्साह महायुतीसाठी जमेची बाजू ठरत आहे.

या प्रचार रॅलीमध्ये केवळ उमेदवारच नव्हे, तर पक्षाचे वरिष्ठ नेतेही मैदानात उतरल्याचे दिसले. माजी आमदार लताताई सोनवणे, माजी नगरसेवक नितीन बरडे, उज्ज्वलाताई बेंडाळे यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते.






