जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२४ । मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील थंडी वाढली असून यातच बंगालचा उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यात कसं असेल हवामान?
दक्षिण भारतातील चक्रीवादळ आणि कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत तापमान १० अंशांवर घसरणार असल्याने जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवणार आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटे तापमान ११.५ अंशांवर आले होते. २९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात गारठा निर्माण होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी वाढ होऊन थंडी कमी होईल. यानंतर पुन्हा पारा घसरू शकतो, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.
राज्यातील या भागात थंडी वाढली
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. काही शहराचे तापमान ८ ते १० डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. परभणीत निच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाने ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या बदलामुळे राज्यात पाच दिवस थंडी राहणार आहे.