जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवासात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, घरांचे देखील नुकसान झाले असून जनावरे सुद्धा वाहून गेली आहेत. अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने मदत जाहीर केली आहे. दरम्यान अशातच हवामान खात्यानं राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून आगामी चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज शुक्रवारी खान्देशातील जळगाव, धुळे नंदुरबार जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र अद्या २७ सप्टेंबरपासून दोन दिवस जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे.

खरंतर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक पोषक ठरल्याने राज्यात आज २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण किनारपट्टी (ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा (पुणे, सातारा, कोल्हापूर), मराठवाडा (धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड) आणि विदर्भातील (बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर) या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या सर्व भागांसाठी सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे.आज फक्त खान्देशातील जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आला नाहीय.
तर तसेच २७ आणि २८ सप्टेंबर रोजी येत्या दोन दिवसात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याला दोन दिवस अलर्ट?
मात्र उद्यापासून दोन दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागच्या तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र यातच हवामान खात्यानं जिल्ह्यात उद्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अन् वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.







