जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । अरबी समुद्र ते पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सायक्लोनिक सर्क्युलेशनची परिस्थिती तयार झाली असून यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले. मागच्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशातच आज हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही गायब झालेला पाऊस परतला आहे. यामुळे पावसाळ्याच्या आगमनाने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

या जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान खात्याकडून आज आज रायगड, रत्नागिरी, सातारा, पुण्याचा घाटमाथा, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
तसेच वर्धा, नागपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्येही जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईत आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उर्वरित महाराष्ट्रात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात पावसाने काहीसा ओढ दिला होता, मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोम धरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आहे. अन्यथा दुबार पेरणीचा धोका निर्माण झाला असता. गेले चार दिवस पावसाने सातत्याने हजेरी लावल्यामुळे आता पाणीटंचाई आणि दुबार पेरणीची भीती दूर झाली आहे.
जळगावातील पावसाची स्थिती ?
दरम्यान मागच्या काही दिवसापासून गायब झालेला पाऊस परतला असून जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने उद्या २६ जुलै रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला. आगामी दोन तीन दिवसात जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातच पुढील तीन दिवस तापमान ३० अंशांच्या खाली जाणार आहे. उद्या शनिवारी जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आला आहे.








