जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद, महापालिका तसेच नगरपालिका शाळांमध्ये सुमारे 9 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये २०२४-२५ आणि मे २०२६ पर्यंत सेवानिनृत्त होणाऱ्या जागांचा देखील समावेश आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दीर्घकाळापासून जाणवत आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असूनही आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. ही समस्या लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी शिक्षक भरतीची जोरदार मागणी केली होती.

त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मेगाभरतीचा निर्णय घेतला आहे.पवित्र पोर्टलवरुन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून मार्चपासून ही भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे, असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची देखील पदे भरली जाणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये ५७०० पदे रिक्त आहेत.
२५ मार्च २०२४ रोजी झालेल्या निर्णयानुसार, जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी शिक्षकांची संख्या जास्त ठरत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. या समायोजनानंतर रिक्त पदांपैकी सुमारे ८० टक्के पदे भरली जाणार आहेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका प्रशासनांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मे २०२६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या पदांचा तपशील समाविष्ट करून त्याची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे भरती प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही आणि वेळेत नियुक्त्या पूर्ण करता येतील.








