जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२४ । गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरूवात केली असून याच दरम्याम, हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.राज्यात पुढचे चार दिवस मघेगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खाते आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ३० जून ते ३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून ते १ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
पुण्यासह सातारा, कोल्हापूरमध्ये हलका ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.