⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

राज्यातील ‘या’ भागात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा ; जळगावात काय आहे स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२४ । राज्यातील अनेक भागात मान्सून पोहोचला आहे. यामुळे मागील काही दिवसापासून राज्यातील विविध ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान आज (ता. १६) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाबरोबरच वादळी वारे देखील वाहण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांचा वेग 30-40 किमी प्रतितास असू शकतो, असं आयएमडीने सांगितलं आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

दरम्यान अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. येत्या २० जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

जळगावात दमदार हजेरी
दरम्यान, शनिवारी दुपारी जळगाव शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान ४० अंशाखाली आहे. आज रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच २० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.