जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यात जळगाव जिल्ह्यातील हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ येथे तब्बल अडीच तास पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून या निकालाच्या दिवशीच राज्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
कुठे कोसळणार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. पुण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तव्यात आली आहे.
विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा इशारा
मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आजपासून पुढील तीन ते चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वची कामे तातडीने आटोपून घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे.
जळगावात काय आहे अंदाज?
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. त्यात सोमवारी दुपारी तापमानात थोडी वाढ होऊन उकाडा वाढला होता. मात्र सायंकाळी जळगाव, भुसावळसह काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. यात भुसावळात रात्री ७.३० ते १० वाजेपर्यंत तब्बल अडीच तास पाऊस झाला. अचानक वारा व पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची व विक्रेत्यांचे तारांबळ उडाली होती. पावसाच्या सरीनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान आज जळगाव, भुसावळसह विविध ठिकाणी वाऱ्यासह तुरळक पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला असून या कालावधीत हवेचा कमालवेग ताशी ३५ ते ४० किलोमीटर राहील.