⁠ 
शनिवार, मे 4, 2024

तारीख पे तारीख ; महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी झाली. मात्र आजही निर्णय होऊ शकला नाहीय. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर २७ सप्टेंबरला सुनावणी होऊन निर्णय येणार आहे.

पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी झाली. २३ ऑगस्टला याप्रकरणाची शेवटची सुनावणी झाली होती. मात्र, त्यानंतर या सुनावणीबाबत सातत्याने पुढील तारखा देण्यात आल्या. याबाबत आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी झाली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेले पाच न्यायमूर्तींचे हे घटनापीठ ही सुनावणी झाली.  यावेळी शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

यावेळी शिंदे गटाचे अॅड. नीरज कौल यांनी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी घटनापीठाकडे केली, तसेच आगामी निवडणूक डोळ्यासमोर असल्याने चिन्हांबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मात्र 27 सप्टेंबर पर्यंत धनुष्यबाणा बाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश घटनापीठाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची विनंती कोर्टाने नाकारल्याचे स्पष्ट झालं आहे.