जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२६ । एप्रिलच्या मध्यन्तरी सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून संपूर्ण महाराष्ट्र आता ‘हॉट झोन’ मध्ये रूपांतरित झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘अति उच्च उष्णता धोका’ (Extreme Heat Risk) जाहीर केला असून, नागरिकांसाठी पुढील ४ दिवस अत्यंत कसोटीचे असणार आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी सूचना
उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ORS घ्यावे, हलके व सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीत विश्रांती घेणे व घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक व मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत आणि उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
जळगावातही उष्णतेचा तडाखा तीव्र होण्याची शक्यता?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आधीच उन्हाचा तडाखा वाढलेला असताना पुढील काही दिवस एप्रिल हीटचे चटके बसण्याची शक्यता आहे. तापमान १.५ ते ३.५ अंशाने वाढून पारा ४५ पर्यंत जाण्याची चिन्हे आहेत. वातावरणात तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. बुधवारी शहरात ४२.३ अंश तापमान नोंदवण्यात आले.






