⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

राज्यातील जनतेला वीज दर वाढीचा शॉक, आता प्रति युनिटसाठी इतके रुपये मोजवे लागणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत असतानाच महावितरणकडून वीजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. वीज नियामक आयोगाने, (MERC)वीज बिलातून (Electricity bill) इंधन समायोजन आकार वसुलीसाठी वीज कंपन्यांना मंजूरी दिली आहे. यामुळे महावितरणकडून ही वाढ करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर या ५ महिन्यांच्या वीज बिलांत इंधन समायोजन आकार वाढून येईल. त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका राज्यातील ग्राहकांना बसणार आहे.

कोरोनातून सावरत असतानाच जनतेला वाढत्या महागाईला सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढल्यामुळे सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता वीजेच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे आधीच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. नुकतेच गॅसचे दर देखील 50 रूपयांनी वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडलं आहे.

इंधन समायोजन आकारात कशी वाढ झाली?

0 ते 100 युनिट आधी 10 पैसे, आता 65 पैसे
101 ते 300 युनिट आधी 20 पैसे , आता 1 रुपये 45 पैसे
301 ते 500 युनिट आधी 25 पैसे, आता 2 रुपये 05 पैसे
501 युनिटच्या वर आधी 25 पैसे, आता 2 रुपये 35 पैसे

जूनपासूनच नवी दरवाढ लागू
जून महिन्याच्या बिलात ही वाढ लागू होईल. ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रति युनिट सरासरी एक रुपया मोजावा लागणार आहे. गेल्या चार महिन्यात वीज खरेदीवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी हा जादा दर वीज बिलात ग्राहकांना भरावा लागणार आहे. महावितरण, रिलायन्स, अदानी, बेस्ट या सगळ्याच कंपन्यांच्या गार्हकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ही दरवाढ 80 ते 300 रुपये प्रति महिना असण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना झटका; कृषी जोडणीत ४० पैसे प्रतियुनिटची दरवाढ
कृषी वापराच्या वीज जोडणीवर मीटर टेरिफ पंपसेटसाठी प्रतियुनिट ४० पैसे तर मीटर टेरिफ इतर ग्राहकांसाठी ६५ पैसे इंधन समायोजन आकार असेल. एलटी इंडस्ट्रियल ग्राहकांसाठी ० ते २० किलोवॅटदरम्यान १ रुपया तर २० किलोवॅटपेक्षा अधिक वापर असलेल्या ग्राहकांना प्रतियुनिट १.२० पैसे अधिक मोजावे लागतील. तर ग्रामपंचायत, नगरपालिकांना पथदिव्यांच्या वीजवापरात १ रुपया व महानगरपालिकांना १ रुपया २५ पैसे प्रतियुनिटने आकार वाढेल. पाणीपुरवठा योजनांत ६५ पैसे ते १ रुपये ५० पैसे प्रतियुनिटची वाढ आहे.