⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सर्वसमावेशक प्रगतीचा अर्थसंकल्प : ना. गुलाबराव पाटील

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज विधीमंडळात मांडलेला अर्थसंकल्प हा समाजाच्या सर्व स्तरांमधील जनतेच्या हिताचा असून एकप्रकारे सर्वसमावेश प्रगतीचा संकल्प सरकारने मांडला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधीमंडळात राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प जाहीर केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे. जगाचा पोशींदा असणार्‍या बळीराजाला तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची योजना ही शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. कृषी व कृषीवर आधारित योजनांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून याच्या जोडीला समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांना विकासाची फळे मिळावीत म्हणून तरतुदी केल्या आहेत. यात महिलांसाठी अतिशय क्रांतीकारी असे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत.

 

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, सरकारने कोविडग्रस्तांसाठी जिल्हा पातळीवर रूग्णालय आणि पोस्ट-कोविड रूग्णांना समुपदेशनाची उपलब्ध केलेली सुविधा देखील महत्वाची आहेच. तर माझ्या खात्याशी संबंधीत असणार्‍या जलजीवन मिशनच्या अंतर्गत राज्यातील घरांना नळ जोडणीचे उद्दीष्टदेखील ठेवण्यात आलेले आहे. गत वर्षी कोविडमुळे निधीत अडचणी आल्या असल्या तरी यंदा पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यालाही  2533 कोटी रूपयांचा निधी मिळाला असून यातून राज्यातील कुणीही तहानलेला राहणार नाही हा विश्‍वास आहे. एकंदरीत पाहता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाचे हित या अर्थसंकल्पातून साधले जाणार असल्याचा विश्‍वास ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.