आधार कार्ड दाखवून काही मिनिटातच मिळेल एलपीजी कनेक्शन; वाचा काय आहे योजना
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । गॅस कनेक्शन नसलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्यांना आता कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची काहीही एक गरज नाही. कारण आता केवळ आधारकार्ड दाखवून ग्राहकांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कंपनीने नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. नवीन शहरात एलपीजी कनेक्शन घेणाऱ्यांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. गॅस कंपन्या नवीन कनेक्शन देण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे मागतात. त्यात विशेषतः रहिवासाचा पुरावा देणे आवश्यक असते. इतर शहरांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडे मात्र हा पुरावा राहत नाही. त्यामुळे त्यांना एलपीजी कनेक्शन मिळण्यात अडचणी येतात. मात्र अशा ग्राहकांना आता सहज गॅस कनेक्शन मिळणार आहे.
अनुदानाचाही घेता येणार लाभ
या नवीन सुविधेबद्दल माहिती देताना इंडेन म्हणाले की, ‘कोणतीही व्यक्ती आधार दाखवून नवीन एलपीजी कनेक्शन घेऊ शकते. त्याला सुरुवातीला विनाअनुदानित कनेक्शन दिले जाईल. ग्राहकनंतर रहिवासाचा पुरावा सादर करू शकतो. हा पुरावा सादर होताच एलपीजीवरील अनुदानाचा लाभही त्यांना घेता येणार आहे. म्हणजेच आधार आणि पत्त्याच्या पुराव्यासोबत जे कनेक्शन घेतले जाईल, ते सरकारी अनुदानाच्या लाभात येईल. जर एखाद्या ग्राहकाला लवकरच कनेक्शन घ्यायचे असेल आणि त्याच्याकडे पत्त्याचा पुरावा नसेल, तर त्याला आधार क्रमांकाद्वारे त्वरित या सुविधेचा लाभ मिळेल.
असे मिळवा कनेक्शन
या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जावे लागेल. त्या ठिकाणी गेल्यानंतर एलपीजी कनेक्शनचा फॉर्म भरावा लागेल. त्यात तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा तपशील देऊन फॉर्मसोबत आधारची झेरॉक्स प्रत जोडावी लागणार आहे. फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या पत्त्याबद्दल स्व-घोषणा, तुम्ही कुठे राहता आणि घराचा नंबर काय आहे हे सांगावे लागणार आहे. याच्या मदतीने तुम्हाला लगेच एलपीजी कनेक्शन दिले जाईल. या जोडणीमुळे तुम्हाला सरकारी अनुदानाचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला सिलेंडरची संपूर्ण किंमत द्यावी लागेल. तुमचा पत्ता पुरावा तयार झाल्यावर तो गॅस एजन्सीकडे जमा केल्यानंतर या पुराव्याची पुष्टी केली जाईल, त्यामुळे गॅस एजन्सी वैध दस्तऐवज म्हणून तुमच्या कनेक्शनमध्ये त्याची नोंद करेल. त्यानंतर तुमचे विनाअनुदानित कनेक्शन सबसिडी कनेक्शनमध्ये रूपांतरित केले जाईल. सिलिंडर घेताना तुम्हाला संपूर्ण रक्कम जमा करावी लागणार आहे. त्यानंतर सरकारच्यावतीने सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.