…तर जळगाव जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्यामुळे १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिल करण्यात आला आहे. यामुळे दोन महिन्यांनंतर शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली, तरी निर्बंधांचे काटेकोर पालन या दोन दिवसांत झालेले दिसून येत नाही. शहरातील वाढत जाणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाची तिसरी लाट निर्माण होऊ शकते. गर्दीचे हेच प्रमाण कायम राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
शहरातील दुकाने पुन्हा उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, पहिल्या दोन दिवसांत नियमांचे पालन होताना दिसून येत नसल्यामुळे व बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे व व्यापाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील दुकाने उघडण्यास पुन्हा परवानगी दिली असली तरी शहरात पुन्हा नियमांचे पालन होत नसल्याचे आढळल्यास प्रशासनाला नाइलाजास्तव पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारादेखील या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
दरम्यान, शहरातील हॉकर्सला मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनदेखील त्या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे आढळून येत आहे. मनपा प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांवर जर शहरातील हॉकर्स व्यवसाय करीत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी यावेळी दिल्या आहेत.
शहरातील हॉकर्स मुख्य बाजारपेठ भागात व्यवसाय करीत असल्याने याच भागात एकाच वेळी हजारो नागरिकांची उपस्थिती होत असल्याने, कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागांवरच व निर्धारित वेळेतच व्यवसाय करण्याच्या सूचनादेखील आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत.
या नियमांचे पालन करावे लागेल
1. दुकानांमध्ये सर्व ग्राहकांना मास्कशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक असू नयेत.
2. दुकानांसमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी आखणी करून देण्यात यावी. दुकानातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण बंधनकारक असेल.
3. गर्दी झाल्यास संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक व्यापारी असोसिएशनने खाजगी सुरक्षादेखील उपलब्ध करून द्यावा.