जळगाव जिल्ह्यात चार गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू असून अशातच आणखी चार जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश आज शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. सुपडू बंडू तडवी (वय-४२, रा. चिलगाव ता. जामनेर), योगेश भरत राजपूत (वय-२९ रा. जामनेर), शेख शाहरुख शेख हसन (वय-२६, रा. इमामवाडा, रावेर) व योगेश देविदास तायडे (वय-३३, रा. महेश नगर, भुसावळ) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे.
याबाबत असे की, जामनेर पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार योगेश भरत राजपूत हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली. पण कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव पाठविला तसेच पहुर पोलीस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेला सुपडू बंडू तडवी हा देखील गैरमार्गाने हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्यावर पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी देखील स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला.
शिवाय रावेर पोलीस ठाण्यात शेख शाहरुख शेख हसन याच्यावर वेगवेगळे प्रकारचे दहशत निर्माण ६ गुन्हे दाखल आहेत तर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हेगार योगेश देविदास तायडे याच्यावर देखील ६ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव केला होता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी आलेल्या चारही प्रस्तावांचे अवलोकन करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना केला.
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी स्थानबद्धतेच्या कारवाईच्या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हेगार योगेश भरत राजपूत याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात, सुपडू बंडू तडवी याला अमरावती कारागृहात, शेख शाहरुख शेख हसन याला कोल्हापूर कारागृहात आणि गुन्हेगार योगेश देविदास तायडे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे, अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.