विना तिकीट फिरणाऱ्यांनो सावधान : एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ लोकांना भरावा लागला दंड

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ एप्रिल २०२३ | भुसावळ विभागीय रेल्वे विभागातर्फे नुकतीच रेल्वेत अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली.रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग व आरपीएफ यांच्यातर्फे तिकीट तपासणी मोहीम यशस्वी झाली. यावेळी रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून मोठा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वेच्या या मोहिमेमुळे एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. फुकट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून रेल्वेने तब्बल त्यात १५ लाख ४४ हजारांचा दंड वसूल केला.

इगतपुरी-भुसावळ, भुसावळ ते अमरावती, खंडवा-भुसावळ विभागात दोन अधिकारी, तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी, अशा एकूण ४७ पथकांनी सुमारे ९४ गाड्यांमध्ये अचानक तपासणी केली. एका दिवसात दोन हजार ४७८ फुकट्या प्रवाशांना पकडून १५ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला.