गुरूवार, सप्टेंबर 21, 2023

गाय-म्हशीसाठी मिळणार दीड लाखांपर्यंतचे कर्ज ; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । तुम्हीही शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनाकडून पशू किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मासे, कोंबड्या, मेंढ्या, शेळी, गाय, म्हशी पालनासाठी पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत कर्ज दिले जाते. जळगाव जिल्ह्यात या योजनेचा अनेक शेतकरी आता लाभ घेऊ लागले असून, यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ लागला आहे.

शेती व्यवसायात वाढत्या उत्पादनाबरोबर शेतकऱ्यांचा खर्चही वाढला आहे. निसर्गाचा लहरीपणा व बाजारपेठेतील दरात होणारे चढ-उतार शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहेत. शेतीत योग्य गुंतवणूक आणि पिकेल ते विकेल’ या धोरणाचा अवलंब गरजेचा झाला आहे. त्यासाठी केंद्राने किसान क्रेडिट कार्डची योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.

किसान क्रेडिट कार्डचे फायदे
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
हे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वय वर्ष ७५ पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना?
शेतीमध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकरी अनेकदा त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून खूप जास्त व्याजदराने कर्ज घेतात. नंतर आयुष्यभर त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहतात. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. ही योजना १९९८ मध्ये सुरू झाली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज मिळण्याची तरतूद आहे.

कसे काढाल किसान क्रेडिट कार्ड?
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. यानंतर किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
याशिवाय बँकांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे केसीसीसाठी अर्ज करू शकतात, मात्र किसान क्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे.