लोकशाही बळकटीकरणासाठी आधार कार्डशी मतदान ओळखपत्र जोडणी करा : धीरज पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । मतदार याद्या अधिकाधिक त्रूटीरहीत करण्यासाठी आता आधार कार्डशी मतदान ओळखपत्र जोडणी करण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. जळगाव रोड परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी परिसरातील शिवसेनेचे तालुका संघटक, सामाजिक कार्यकर्ते प्रा.धीरज गणेश पाटील यांनी गणशोत्सवानिमित्त शिबीर आयोजित केले असून दि. १० सप्टेंबर २०२२ पर्यंत फॉर्म संकलित केले जाणार आहे.
तीन ठिकाणी फॉर्म संकलन:
परिसरात ३ हजार परिवारांना फॉर्मचे वाटप केले आहे. अनेक वेळेस एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे दोन ते नवीन वेगवेगळ्या याद्यांमध्ये समाविष्ट असतात, त्यामुळे बीएलओना सुद्धा ओळख पटवणे कठीण होते. यासाठी उपाय म्हणून एकाच फॉर्मवर पूर्ण कुटुंबाची संयुक्त माहिती भरून घेतली जात आहे. नागरिकांना या फॉर्म वर कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार कार्ड, मतदान कार्ड क्रमांक आणि मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देणे आहे. रिंग रोडवरील चितोडे वाणी समाज मंगल कार्यालयासमोरील श्री मोरया क्रिएशन, भिरूड कॉलनी येथील आशीर्वाद झेरॉक्स, तसेच विद्यानगर येथील सुजीवन प्रोव्हिजन येथे दिनांक १० सप्टेंबर २०२२ पर्यंत फॉर्म संकलित केले जाणार आहे.
आधारकार्ड हे मतदान ओळखपत्राशी जोडणे हे महत्त्वाचे झाले आहे. या प्रणालीमुळे आधारकार्ड मतदार कार्डशी लिंक करणे सोपे होणार आहे. शिवाय नागरिकांचा आणि बीएलओचा वेळ वाचणार आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी नागरिकांनी याबाबत पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.