जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असून याच दरम्यान मागील दोन दिवसात जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या असून यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर शेतमजूर जखमी झाला आहे. तसेच एका बैलाचा देखील मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील चार- पाच दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, जामनेर, रावेर तालुक्यात अधिक नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. याच दरम्यान मागील दोन दिवसात दोन ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली आहे.
जामनेर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यातच मौजे बिलवाडी येथील हिराबाई गजानन पवार (वय ३५) यांचा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वीज पडून मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचे निर्देश दिले. नैसर्गिक आपत्ती निवारण निधींतर्गत शासकीय नियमानुसार चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात येईल, असे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी यावेळी सांगितले.
शेतात गेलेल्या शेतमजुर जखमी
अमळनेर तालुक्यातील खर्दे येथील शेतात गेलेल्या शेतमजूर वीज पडल्याने गंभीर भाजला गेले आहे. शेतात कुट्टी करण्याचे काम सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. यामुळे सालदार बैलगाडी खाली येऊन बसला. गाडीला पाच जनावरे बांधली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक वीज पडल्याने बैल जागीच दगावला व इतर जनावरेही जखमी झाले. तर सालदार राहुल बारेला गंभीर भाजला गेला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.