आयातबंदी उठवल्याने धान्याचे दर घसरले
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । उडीद, मूग, तूर आणि हरभऱ्याच्या आयातीवर तीन वर्षांपासून असलेली बंदी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने उठवल्यामुळे या धान्याचे दर क्विंटल मागे ७०० ते ८०० रुपयांनी घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडण्यासह हमीभावापेक्षाही कमी दरात माल खरेदी केल्यास व्यापारीदेखील अडचणीत येणार आहे. यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन आयात बंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
आठवडाभरापूर्वी (१५ मे) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार विभागाने आयातबंदी उठवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर त्या मालाची मोठ्या प्रमाणात आयात सुरू झाली आहे. सध्या देशात या चारही उत्पादनांचे दर हमीभावाच्या जवळपासच आहेत. यात हमीभावापेक्षा कमी किमतीत माल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. या भीतीमुळे व्यापारीही धास्तावले आहेत.
आठवडाभरात मोठी घसरण
आयात बंदीच्या निर्णयाने आठवडाभरात भावात मोठी घसरण झाली आहे. यामध्ये उडदासाठी सहा हजार हमी भाव असून आयात बंदी उठविण्याआधी त्याला ६५०० ते ७८०० रुपये भाव मिळत होता. आता हाच भाव पाच हजार ते सहा हजारांवर आला आहे. अशाच प्रकारे मुगाचा हमी भाव ७१९६ असून आयात बंदी उठविण्याआधी त्याला ७००० ते ७५०० रुपये भाव मिळत होता. आता हाच भाव चार हजार ते सहा हजारावर आला आहे. तुरीचा हमी भाव ६००० असून पूर्वी तिला ६५०० ते ७२०० रुपये मिळणारा भाव आता ५५०० ते ५८०० वर आला आहे. तर हरभऱ्याचा हमी भाव ५१०० असून पूर्वी त्याला ५१०० ते ५४०० रुपये भाव मिळत होता. आता तो ४६०० रुपयांवर आला आहे.
याबाबत जळगाव जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनतर्फे असोसिएशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री नरेंद्र तोमर, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कडधान्याचे दर हमीभावापेक्षाही खाली आले आहेत. अशाने कडधान्याचे पेरणी क्षेत्र कमी हाेणार आहे. दुसरीकडे हमीभावापेक्षा दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने कडधान्य खरेदी करण्याची जाेखीम उचलावी लागेल. त्यामुळे नुकसान होईल. म्हणून केंद्र शासनाने आयात बंदी करावी, अशी मागणीही या पत्राद्वारे पंतप्रधान आणि स्थानिक खासदार व पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.