दणका : धान्य वाटपात तफावत, ८ दुकानदारांचे परवाने निलंबीत, एकाचा रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । लाभार्थ्यांसोबत धान्य वाटपात तफावत करणे, पावती न देणे यासह इतर प्रकारची अफरातफर करणाऱ्या शहरातील ८ रेशन दुकानदारांचे परवाने गुरुवारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी निलंबित केले आहे. तर खेडीतील पार्वताबाई अपंग शिक्षण प्रशिक्षण मंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या दुकानाचा थेट परवाना रद्द करण्यात आला आहे. शहरात करण्यात आलेल्या या कारवाईच्या दणक्याने अनेक रेशन दुकानदारांनी धास्ती घेतली आहे.
शहरातील काही रेशन दुकानदार हे लाभार्थी नागरिकांना धान्य वाटप करतांना कमी प्रमाणात धान्य देणे, माल खरेदी केल्याची पावती न देणे, धान्य वाटप न करणे, पुरवठा विभागाचे पथक आल्यावर दुकान बंद करून निघुन जाणे, तसेच मंजुर जागेवर दुकान न चालविता दुसऱ्या ठिकाणी चालवणे आदी प्रकार करीत असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
या दुकानांचा समावेश
पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत वाहेद खान बिस्मिल्ला खान पठाण, तांबापुरा. भिका सोनवणे, मेहरुण. मिलाफचंद जैन, शिवाजीनगर. प्रकाश भंगाळे, ईश्वर कॉलनी, कैलास कथुरिया यांचे नवनाथ दारकुंडे यांच्या दुकानाला जोडलेले, शिवाजीनगर. अपना ग्राहक भांडार, मेहरुण सभापती आदर्श नागरी पतपेढी, तांबापुरा. अनिल पाटील, समता नगर यांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. पार्वताबाई अपंग शिक्षण प्रशिक्षण मंडळ, खेडी मोंजे, ता. जळगाव यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.