चाळीसगाव तालुक्यात उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे बछडे
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथे एका उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथे उपसरपंच सुभाष पाटील यांचे शेत आहे. या शेतात त्यांना रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बिबट्याचे दोन बछडे दिसून आले. त्यांनी तात्काळ ही माहिती वन विभागाला दिली. वनविभागाने पाहणी केली असता बिबट्याचे एक नर जातीचे नुकतेच जन्मलेले बिबबट्याचे बछडे आढळून आले. तर दुसरे बछडे कुठेतरी निघून गेले असावे अथवा मादी बिबट्याने ते नेले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वन विभागाने शेतात या ठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. किमान आठ ते दहा दिवसाचे नर जातीचे हे बछडे असून त्याला घेण्यासाठी मादी बिबट्या येवू शकते, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.