जळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२३ | जिल्ह्यात अवैधरित्या होत असलेला वाळू उपसा व वाळू माफियांची वाढती दादागिरीमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. कारवाई करणाऱ्या महसूल, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत वाळू माफियांची मजल गेली आहे. गेल्या आठवड्यात यावल तालुक्यातील महिला मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी वाळू माफियांविरोधात आक्रमक भुमिका घेत सर्वांची कुंडली काढण्याचे आदेश दिले आहेत.
वाळू माफियांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी महसूल विभाग व पोलीस विभागाने एक ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आदींची बैठक झाली आहे. त्यात अनेक निर्णय झाले आहेत. त्यानूसार यापुढे वाळू उत्खनन, वाळू भरणा, वाहतूक व बांधकाम व्यावसायिकांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
एप्रिल २०२३ पासून अवैध वाळू उपसा करणे, तिची वाहतूक करणे, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आदी प्रकरणांत ज्यांच्यावर सातत्याने गुन्हे दाखल आहेत, अशा सर्वांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल देण्याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी वाळूची वाहतूक होत होती, जेथे वाळूचा साठा, डेपो आहे अशा ठिकाणांचा पंचनामाही होणार आहे. वाळू माफीयांची कुंडली काढताना कोणी अधिकारी व कर्मचाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल.
असा आहे अक्शन प्लॅन
नदीपात्रातून वाळूचे उत्खनन कुठे होते? ज्या नागरिकांना शेतातून वाळू घाटात जाण्यासाठी प्रवेश दिला आहे, ते तपासले जाणार आहे. त्यांचा सहभाग आहे काय, याची तपासणी होईल. उपसा करणारे मजुर कोण? कोणत्या साहित्याद्वारे उपसा केला? ते तपासले जाईल. उत्खनन केलेली वाळू कुणासाठी होती? याची माहिती घेतली जाईल. वाळूचे वाहन पकडल्यावर चालकाचा वाहन परवाना, प्रदूषण प्रमाणपत्रासह आरटीओच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल
कर्जावर वाहन घेतले असल्यास संबंधित बँकेला त्याची माहिती कळविली जाईल. वापरलेल्या वाळूतून उभारलेल्या बांधकामाला परवानगी होती का? याची माहिती घेतली जाईल. अवैध वाळूचे वाहन आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करून कॉल डेटा रेकार्डची माहिती उपलब्ध केली जाईल. वाळू वाहतूक करणाऱ्यांसोबत कोण होते, तेही चौकशीतून निष्पन्न केले जाईल. चोरीची वाळू खरेदी करण्यासाठी कोण तयार झाले, त्यांची नावेही शोधली जातील.