जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । राष्ट्रवादी काँगेस म्हणजे आज राज्याची सत्ता प्रस्थापित करताना महत्वाची भूमिका बजावणारा पक्ष आहे. देशात आपला वेगळा नावलौकिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावात आणि विशेषतः शहरात घरघर लागल्याचे पाहावयास मिळत आहे. पक्षातील नेत्यांना स्थानिक पातळीवर असलेले मतभेद दूर करता करताच नाकीनऊ आले असून पक्षवाढीचे सोडा स्वतःचेच गाऱ्हाणे मुंबई दरबारी घेऊन जाणारे पदाधिकारी सध्या जिल्ह्यात आहे. कुरघोडीचे राजकारण करीत विद्यमान पदाधिकाऱ्यांनी इतरांच्याच खुर्च्या पळविल्या. स्वतःची पोळी शेकून घेण्यात धन्यता मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे कान टोचायचे सोडून खा.सुप्रिया सुळे यांनी पदांचा उपभोग घेणाऱ्यांचीच झाक झाकून ठेवण्यात धन्यता मानली. दैनिकाच्या सर्क्युलेशन्सवर बोट ठेवत त्या आपल्या पक्षाची खरोखर वाढ का होत नाही? याचे आत्मचिंतन करण्यास किंबहुना थेट स्थानिक पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्यास विसरल्या. आगामी निवडणूक लक्षात घेता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस येऊ शकतात परंतु त्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा, पक्ष आहे त्याच ठिकाणी थांबेल आणि पक्षाचे सर्क्युलेशन्स ठप्प होईल हे निश्चित.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी गेल्या अडीच वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात दौरे केले. मात्र यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ तर झालीच नाही परंतु पक्षांतर्गत असलेले वाद त्यांच्यासमोर उभारून आले. भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आले तरीसुद्धा राष्ट्रवादीला जळगाव जिल्ह्यात अच्छे दिन आले नाहीत, उलट पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना डावलून आयाराम-गयारामला पुढे करण्यात आल्याने ओरड झाली. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्ह्यात भवितव्य काय? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच पडला आहे.
जिल्ह्यात असे मोठे मोठे नेते येऊनही जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ का होत नाही? असा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये खा.सुप्रिया सुळे यांना एका माध्यम प्रतिनिधीने विचारला. यावेळी सुप्रिया सुळे यांचे उत्तर असं होतं की, तुमचं वृत्तपत्राच्या सर्क्युलेशन प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारखे असते का? जर नसतं तर तुम्ही अशीच अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशी करू शकता, हे उत्तर देताना सुप्रिया सुळे काही गोष्टी विसरल्या. त्या म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा जळगाव जिल्हा हा गड मानला जायचा. जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुणभाई गुजराथी यांच्या रूपाने विधानसभा अध्यक्ष देखील दिला. याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव देवकर यांनी देखील जबाबदारी सांभाळली. जळगावातून ईश्वरलाल जैन राष्ट्रवादीचे खासदार देखील होते. जिल्ह्यात अनेक आमदार राष्ट्रवादीने दिले. थोडक्यात काय तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ होते.
इतकी सगळी पदे जळगाव जिल्ह्यामध्ये होऊनही सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, ज्याप्रकारे वृत्तपत्राचा सर्क्युलेशन संपूर्ण राज्यात एक सारखे होऊ शकत नाही त्याचप्रमाणे एखादा पक्ष ही संपूर्ण राज्यात समानपणे वाढवू शकत नाही. मात्र सर्क्युलेशन वाढवण्यासाठी त्या वृत्तपत्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जातात पण तेच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी करत नाही असे चित्र समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकनाथराव खडसे पक्षात आल्यामुळे जिल्ह्यात अच्छे दिन येतील असं सर्वांनाच वाटलं होतं मात्र सध्या तरी ते दिसत नाहीये. खडसे पक्षात आल्यानंतर कुठे कशी नाराजी झाली हे सर्वांनाच माहिती आहे. राष्ट्रवादीने स्वतः त्याचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील मोजके हाडाचे कार्यकर्ते सोडले तर इतर कार्यकर्ते नेते मंडळी नसतात तेव्हा कुठे असतात असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.
राष्ट्रवादीने वेगवेगळे सेल निर्माण करीत खिरापत सारखे पद वाटप केल्याने प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला नेता समजू लागला आहे. नवीन कार्यकर्त्यांना नेतेपद मिळाल्याने ते वरिष्ठांना तर मानसन्मानच देत नाहीत हेच सत्य आहे. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग आणि काल खा.सुप्रिया सुळे भाषण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील हे व्यासपीठासमोर उभे होते तर इतर सर्व सोमेगोमे व्यासपीठावर दिमाखात बसले होते. सर्वांनीच हा प्रकार आपल्या नजरेत कैद केला. व्यासपीठावरील एकाही स्वघोषित नेत्याला असे वाटले नाही की जरा रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना बसायला जागा द्यावी.
दुसरीकडे नवीन पिढी वरिष्ठ आम्हाला जिल्ह्यात काम करायला सहकार्य करत नाहीत असा आरोप नेहमीच जेष्ठ नेते करतात. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव शहर महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी देखील हाच आरोप लावत पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते फारसे सक्रिय राहिलेच नाही. स्वतःहून त्यांनी स्वतःला दूर करून घेतले. अभिषेक पाटील तरुण नेतृत्व असल्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी मोठी होती मात्र आता अशोक लाडवंजारी यांच्याकडे नेतृत्व आल्यापासून शहरात राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्तेच दिसत नाही. आजच्या मोर्चा मध्ये जे तीनशे-चारशे कार्यकर्ते आले होते त्यात स्वतःला कार्यकर्ता म्हणणारा एकही जण दिसला नाही. सर्व स्वतःची ओळख या ना त्या सेलचा प्रमुख, सचिव किंवा इतर काही अशी करून देत होता. यामुळे जळगाव जिल्ह्यात सुप्रिया सुळे म्हणाल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकच चूक पुन्हा पुन्हा होत राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात न ‘सरक्यूलेट’ होणाऱ्या वृत्तपत्रासारखे जळगाव जिल्ह्यात नॉन सर्क्युलेशन पक्ष बनून राहील अशी भीती देखील वर्तवली जात आहे.
सुप्रिया सुळे यांनी किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कारण देणे बंद करून जिल्ह्यामध्ये स्वयंस्फूर्तीने पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे, नाहीतर पक्षाध्यक्ष खा.शरद पवार आले की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षाप्रमाणे दिसतो. खा.सुप्रिया सुळे आल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसतो अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की नाही असाच प्रश्न विचारला जातो आणि तीच अवस्था पुढेही राहील असे म्हटले जात आहे.