निवडणूक आयोग शिंदे गटाला देणार धक्का! लता सोनवणेंची आमदारकी रद्द होणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२२ । शिंदे गटाला धक्का एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. कारण आ. सोनवणे यांच्या जातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी समिती लवकरचं निर्णय़ देण्याची शक्यता आहे. त्यामुळं लता सोनावणे यांना विधानसभेतून अपात्र ठरविलं जाऊ शकतं.

लता सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांचा पराभव केला. निवडणुकीनंतर जगदीशचंद वळवी यांनी सोनवणेंच्या विरोधात जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. खंडपीठाने नंदुरबार जात पडताळणी समितीला चौकशीचे आदेश दिले होते.

जात पडताळणी समितीनेही आमदार सोनवणेंचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर सोनवणे यांनीदेखील समितीच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. मात्र खंडपीठाने जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर लता सोनवणेंनी थेट सर्वोच्च न्यायालयातही या निर्णयाला आव्हान दिलं. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही खंडपीठानेही आमदार सोनवणे यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनीही लता सोनावणे यांना अपात्र ठरवता येईल का अशी विचारणा राष्ट्रीय एसटी आयोगाकडं केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं सोनावणे यांचं जातप्रमाणपत्र बनावट असल्याचं म्हटल्यावरही अपात्रतेची कारवाई झाली नाही. त्यामुळ चंद्रकांत बरेला यांनी नॅशनल कमिशन फॉर एसटीमध्ये याचिका दाखल केली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लता सोनावणे या चोपडा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडूण आल्या. या निवडणुकीत त्यांना ७८ हजार १३७ मतं मिळाली. त्यांनी जगदीशचंद्र वळवी व चंद्रकांत बरेला यांना पराभूत केलं. शिवसेनेत बंड झाल्यानंतर लता सोनावणे शिंदे गटात गेल्या.

शिंदे यांच्याकडं सध्या ५० आमदार आहेत. त्यांच्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा आहे. त्यामुळं लता सोनावणे यांची आमदारकी रद्द झाली तर तो शिंदे गटासाठी मोठा धक्का असणार आहे.