जळगाव लाईव्ह न्यूज : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक पतसंस्था बुडल्या किंवा बुडवल्या गेल्या. पतसंस्थांमधील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदार होरपळले गेले. अशा नकारात्मक परिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यभर बदनाम झाले असले तरी दुसर्याबाजूला जळगाव जिल्ह्यातील एका पतसंस्थेच्या कामामुळे जळगावचे नाव केवळ राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर थेट आशिया खंडात गौरविले जात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. अर्थत ग.स. सोसायटीची (G S Society Jalgaon) वाटचाल नाबाद १०० वर सुरू आहे. आजमितीस संस्थेचे ३४ हजार ९०० सभासद असून संस्थेकडे तब्बल १००० कोटींच्यावर खेळते भांडवल आहे. यावरून संस्थेची सहकार क्षेत्रातील ग.स.च्या वैभवाची प्रचिती येते…
गौरवशाली इतीहास
सन १९०६ मध्ये सरकारी कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे त्यावेळच्या खान्देश विभागाची कामकाजाची सुसंगती निर्माण व्हावी म्हणून तत्कालीन सरकारने पुर्व खान्देश पश्चिम खान्देश असे खान्देशचे दोन भाग केले. धुळे येथील मुख्य केंद्राची विभागणी होऊन पुर्व खान्देश जिल्ह्याचे मुख्यालय जळगाव येथे करण्यात आले. शासनातील कार्यालयीन कामकाजाच्या विभागणी बरोबर नोकर वर्गाची देखील विभागणी होऊन बराचश्या नोकरवर्गाच्या दृष्टीने जळगाव हे त्यांना नवीनच होते. त्यामुळे या भागात ना कोणाशी ओळख ना परिचय सर्वच अनोळखी असल्यामुळे घर भाड्याने मिळविणे, आर्थिक अडचणींच्या प्रसंगी मदत मिळविणे, दुकानदारांकडून उधारीने माल मिळविणे इत्यादी दैनंदिन संसार चालविण्यात नानाविधी समस्यांचा या बदलून आलेल्या नोकरवर्गासमोर मोठाच प्रश्न उभा राहीला.
आपल्या दैनंदिन अडचणी निवारण करण्याचा प्रयत्न नोकरवर्गाने सुरु केला. त्यावेळेस नुकताच सन १९०४ मध्ये हिंदुस्थानच्या सहकारी पतपेढीचा कायदा पारित झालेला होता. त्यावेळी सरकारने केलेल्या कुठल्याही सुधारणा अगर कायदे हे प्रामुख्याने सरकारी अधिकार्यांमार्फत अंमलात आणले जात होते. त्यामुळे सर्व साधारण जनतेपेक्षा या सुधारणांची अथवा कायद्याची खरी जाणीव व माहिती सरकारी नोकरांनाच विशेषततत्वाने होती. त्यामुळे जळगाव येथील सरकारी नोकरांचे आपल्या वैयक्तीक आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांमधुनच सन १९०४ च्या सहकारी कायद्यान्वये पगारदार नोकरांची सहकारी पतपेढी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणीती म्हणून १५ डिसेंबर १९०९ रोजी पूर्व खान्देश सहकारी नोकरांची म्युचुअल हेल्प आणि प्रॉव्हीडंड फंड को-ऑप. सोसायटी जळगावची स्थापना करण्यात आली.
१४ सभासदांनिशी जानेवारी १९१० पासून शुभारंभ
मर्यादित उत्पन्न असलेल्या पगारदार सरकारी नोकरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या संस्थेच्या कामकाजास प्राथमिक १४ सभासदांनिशी जानेवारी १९१० पासून शुभारंभ केला. परस्पर सहकार्याने संस्थेमार्फत पगारदार नोकरांना आपल्या दैनंदिन जीवनातील आर्थिक समस्या सुटण्याचे महत्व ज्या प्रमाणात जाणवू लागले त्या प्रमाणात सरकारी नोकरदार वर्ग या संस्थेकडे आकर्षित होऊ लागला. १४ सभासदांनिशी सुरुवात झालेल्या संस्थेची सभासद संख्या १९११ अखेर १२१ वर गेली. जळगाव (पुर्व खान्देश) मधील सरकारी नोकरांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी परिश्रमपूर्वक स्थापन केलेल्या या सहकारी पतपेढीची मदत तिच्या सभासदांना चांगल्याप्रकारे होऊ लागली. संस्थेने आपल्या कार्यात योग्य प्रकारे सुरुवात केली. या सहकारी पतपेढीचे फलित, प्रगती आणि कार्य पाहून पश्चिम खान्देशातील धुळे येथील सरकारी नोकरांनाही या संस्थेकडून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होऊ लागले.
सरकारी नोकरांनी खासगी सावकाराच्या जाचक अटी व व्याज लादून घेऊन अन्य ठिकाणाहून कर्ज घेण्यापेक्षा सोसायटीकडून माफक व्याजाचे कर्ज घेण्याची सभासदांची प्रवृत्ती बळावत गेली. त्यामुळे सभासद संख्येत वाढ होत गेली. सोसायटीबाबत जनतेचा विश्वा वाढल्याने सभासद संख्या वाढतच गेली. सोसायटीच्या कामकाजाचा विस्तार वाढू लागला. सन १९१३-१४ मध्ये सभासद संख्या २१७ पर्यंत पोहचली. संस्थेला ३६६ रुपये नफा झाला. यावर्षीच्या सर्वसाधारण सभेत सभासदांना परस्पर सहकार्याने सोसायटीचा आणखी जादा फायदा व्हावा, उपयोग घेता यावा, म्हणून सभासदांना दैनंदिन संसारात उपयुक्त अशा जीवनोपयोगी वस्तूंचे व धान्याचे दुकान सुरु करावे, असा ठराव चर्चेस आला. या ठरावानुसार कार्यवाही होऊन पुढील वर्षी संस्थेने धान्य दुकान चालविण्याचा प्रयत्न केला.
हळूहळू कार्यकक्षा वाढवली
सोसायटीचा फायदा अन्य खात्यांतील नोकर वर्गास व्हावा, सरकारच्या खर्या व उदात्त तत्त्त्त्वाचा हेतू लक्षात घेऊन शाळा खात्यातील १५ रुपयांपेक्षा जादा पगार असलेल्या पगारदार नोकरांनाही सोसायटीचे सभासद करुन घेण्यात आले. पुढे मुलकी, न्याय, पोलिस, टपाल, पब्लिक वर्क्स, फॉरेस्ट, शाळा, लोकल बोर्ड या खात्यांतील नोकरवर्गासही सभासद करुन घेण्यास मान्यता देण्यात आली. संस्थेने आपल्या सभासदांशी सहकार्याची भावना तर ठेवलीच पण इतरांनाही सहकार्याचा हात दिला. सन १९१६ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संस्थेस तिच्या कार्यालयासाठी आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये जागा दिली. व बँकेची महत्वाची अडचण दूर केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्वतःची इमारत होईपर्यंत या बँकेचे कार्यालय सोसायटीच्या इमारतीमध्ये चालू होते. सन १९३९ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस जाण्याची वेळ आली होती. परंतु बँकेवरील कठिण आर्थिक प्रसंग व खर्या सहकाराची जाणीव ठेवून जिल्ह्यातील या एकमेव सोसायटीने त्याही अवस्थेत आपली रु.१,४०,००० मात्रची ठेव बँकेत ठेवून बँकेची डबघाईची परिस्थिती कायमची सुधारण्यास मोठा आधार दिला.
ग.स.च्या जिल्हाभरात ५५ शाखा
सन १९५९ मध्ये संस्थेच्या स्थापनेस व तिच्या कार्यास, कामकाजास ५० वर्ष पूर्ण झाल्याने संस्थेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. ३/२/१९८५ रोजी अमृतमहोत्सवी समारंभाच्या वेळी ही योजना स्वीकारण्यात येऊन सुरु करण्यात आली. बहुसंख्य सभासद या योजनेचा लाभ आजही घेत आहेत. चालु दशकात राज्यातील पतसंस्था भ्रष्ट्राचाराचे कुरणे बनल्याने लाखो ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी हडपुन अनेक संचालक गब्बर झाले. यामुळे लोकांचा पतसंस्थांवरील विश्वास उडाला. मात्र या कठीण समयीही ग.स. सोसायटीवरील विश्वास जराही कमी झाला नाही. यामुळे ग.स. केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपुर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी आदर्श ठरली आहे. आज मितीस ग.स.च्या जिल्हाभरात ५५ शाखा असून प्रत्येक शाखेला स्वत:ची इमारत देखील आहे. १०० टक्के कर्जवसूली हेच संस्थेच्या यशाचे गमक आहे. (क्रमश:)