⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

तापी-पुर्णा संगमावर मेळसांगवे हद्दीत सापडला वाळुचा भलामोठा साठा?

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे-पंचाणे येथील तापी-पुर्णा संगमालगत मेळसांगवे शिवारातील तापी नदीपात्रात वाळुचा भलामोठा साठा वाळु तस्करांच्या हाती लागला असून रात्रदिवसा अनेकांनी ट्रॅक्टरद्वारे वाहतुक करुन शेती शिवारात तसेच रस्त्यालगत जिथे जागा मिळेल तिथे वाळुचे ढिग जमा करण्यात येत आहे. मात्र या प्रकाराबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे कळते.

याबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहीतीनुसार चार-पाच दिवसांपूर्वी येथे वाळु असल्याचा प्रकार लक्षात आला. दरम्यान रेती चांगली असल्याने अनेकांनी ट्रॅक्टरद्वारे जागा मिळेल तिथे वाळुची वाहतुक करुन साठा केलेला आहे. या चार ते पाच दिवसांत अनेकांनी चोरट्या पद्धतीने रेती सप्लाय केली तर काही रेतीचे ढिग जमा करण्यात आले आहे.याबाबत परीसरात होत असलेल्या चर्चेच्या आधारे महसुल विभागातील वरीष्ठ अधिकारी यांचेशी संपर्क साधुन याबाबत विचारणा केली असता,याप्रकाराबाबत कोणतीही कल्पना संबंधित विभागाला नसल्याचे समजते.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मधुकर भोई व मनसे कार्यकर्ते यांनी तालुक्यातील अवैध वाळु उपसा व वाहतुकीबाबत महसुल विभागात महीनाभरापासुन वारंवार तक्रारी देत आहे.दरम्यान प्राप्त तक्रारीनुसार तहसीलदार श्वेता संचेती यांनी आज तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथील धुपेश्वर पुलानजिक पुर्णा नदीपात्रात पाहणी करण्यास गेल्या होत्या. यामुळे वाळु तस्करांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा परीसरात चांगलीच रंगली असल्याचे समजते. महसुल विभागाकडुन काय कारवाई वैगरे झाली का या संदर्भात तहसीलदार श्वेता संचेती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान अवैध वाळु वाहतुकीचा प्रश्न चर्चिला जात असुन संपुर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष याविषयी केंद्रीत आहे.महसुल विभागाकडुन काय कारवाई केली जाईल याकडे लक्ष लागुन आहे.