जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२५ । विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. या लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होत आहे. जुलै २०२४ ते मार्च २०२५ महिन्यापर्यंतच्या हप्त्याचे पैसे महिलांना मिळाले आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागले आहे. अशातच आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.