जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात असून आतापर्यंत जानेवारी महिन्यापर्यंत पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र फेब्रुवारी महिना संपला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाहीय. यामुळे या महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता. दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

फेब्रुवारी महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता ८ मार्च या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येणार आहे, तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्चअखेरीस देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अर्थव्यवस्थेवर ताण येणार असल्याने सरकार ही योजना बंद करील अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही लोककल्याणकारी योजना बंद होणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे, असे त्या म्हणाल्या.