जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यी महिलांसाठी महत्वाची आहे. एप्रिल महिना उलटूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झाला नाहीय. एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता राज्यभरातील बहिणींना लागली असून अशातच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिलचा सन्मान निधी कधीपासून बँक खात्यात जमा होणार आहे, या संदर्भातील महत्त्वाची अपडेट दिली आहे.

आदिती तटकरेंनी आपल्या एक्सवर पोस्ट करत म्हटले की, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. तर, ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. असं आदिती तटकरे म्हणाल्या.
खरंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जातात. मात्र, यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील..