जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक खुशखबर आहे. मागील काही दिवसापासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच आजपासून लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. मात्र, अजित पवारांनी ८ दिवसांत पैसे येतील, अशी माहिती दिली होती. अर्थ मंत्रालयाने निधीच्या चेकवर सही केलेली आहे. त्यामुळे आता पैसे जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल.
दरम्यान मार्च महिन्याच्या ३ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पाआधी फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे. कारण, अर्थसंकल्पात २१०० रुपयांबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे त्याआधी पैसे दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी असा प्रश्न विचारण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबत मार्च महिन्यात अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते. जर मार्च महिन्यात घोषणा झाली तर पुढचा हप्ता २१०० रुपयांचा मिळणार आहे.