जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२५ । राज्यातील पावसाचा जोर ओसरला असून बहुतांश जिल्ह्यात सध्या पावसाने सुट्टी घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाली. यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात आगामी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.

दरम्यान आज १९ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील १९ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
सुरुवातीला झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे जिल्ह्यातील रावेर, यावल, अमळनेर, धरणगाव आणि चोपडा या तालुक्यांमध्ये पावसाची सर्वाधिक कमतरता जाणवत आहे. या तालुक्यांमध्ये सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे कोरडवाहू शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. पावसाअभावी मका, उडीद, मूग आणि कोरडवाहू क्षेत्रावरील कपाशीची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी तर तीव्र उन्हामुळे पिके जळू लागल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाचा अंदाजः
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कमी आहे. सध्या अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस थांबला आहे. विदर्भात जरी पाऊस होत असला तरी, तो बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असून, ते विदर्भाकडून मध्य प्रदेशाकडे सरकत आहे.







