⁠ 
शनिवार, मे 4, 2024

गिरणा नदीच्या डोहात बुडून मजुराचा मृत्यू ; तब्बल ६ तासांनी सापडला मृतदेह

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यातील म्हसावद तालुक्यातील गिरणा नदी पात्रात बुडून मजुराचा मृत्यू झाला. किशोर मराठे (वय ४०) असं मृत मजुराचे नाव आहे.

किशोर श्रावण मराठे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. किशोर मराठे (वय ४०) हे म्हसवड गावात हातमजुरीचे काम करत होते. सकाळी ९ वाजता घरातून कामाला जाण्यासाठी निघाले. त्यानंतर, हात पाय धुण्यासाठी १०.३० च्या सुमारास गिरणा नदीच्या पात्रात गेले. तेव्हा, अचानक त्यांचा पाय घसरून डोहात पडले. डोहाची खोली जास्त असल्याने त्यांना पाण्यातून बाहेर येणे शक्य झाले नाही.

नदीकाठावर कपडे धुणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंचांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी तपास सुरु केला. मात्र मृतदेह हाती न लागल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवण्यात आले. सायंकाळी ५ वाजता पथकातील कर्मचाऱ्यांना अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडला.

जिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर, मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. किशोर मराठे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.