जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । मागच्या २० दिवसाच्या खंडानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केला असून मागच्या दोन-तीन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 13 हजार 217 शेतकरी बाधित झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अखेरीपासून पावसाने दडी मारली होती. अर्धा ऑगस्ट महिना संपला तरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे पावसाअभावी वाढीच्या तसेच फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम झाला होता. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अशातच शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री आणि त्यांनतर जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात १५ आणि १६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसह वादळी वारे आणि पुराच्या पाण्यामुळे २०८ गावांमधील सुमारे १३ हजार २१७ शेतकरी बाधित झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे १० हजार १९६ हेक्टरवरील कपाशी, मका, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग, केळी, ऊस आणि भाजीपाला पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यापैकी मक्याचे सर्वाधिक ४२८४ हेक्टर, कपाशीचे ३८८४ हेक्टर, सोयाबीनचे ८३८ हेक्टर, केळीचे १०८ हेक्टर, ज्वारी-बाजरीचे ७६ हेक्टर आणि इतर फळ पिकांचे ७६ हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव दौऱ्यावर असताना, अतिवृष्टीसह इतर कारणांनी नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहेत. प्रत्यक्षात पाऊस थांबायचे नावच घेत नसल्याने महसूल व कृषी विभागाला पिकांचे पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतरच नुकसानीच्या पंचनाम्यांना गती मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.







