⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अश्‍लिल हावभाव प्रकरणी चर्चेत असणार्‍या या नृत्यांगणेला ‘खान्देश कन्या’ पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२३ । अश्‍लिल हावभाव प्रकरणी चर्चेत असणारी लावणी क्विन व सोशल मीडिया स्टार म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणारी गौतमी पाटील हिला ‘खान्देश कन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गौतमीच्या नृत्याचे जितके चाहते आहेत, तितकेच तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत. मात्र, लावणी करतांना गौतमी अश्लिल हावभाव करते म्हणून तिच्यावर सातत्याने टीका होत असते. या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलला आता मायभूमीतून बळ मिळालं आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते तिचा ‘खान्देश कन्या’ म्हणून गौरव करण्यात आलाय.

सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली नृत्यांगण गौतमी पाटीलवर अनेकदा टीका होते. गौतमीच्या डान्सवरुन तिला ट्रोल केलं जातं. मध्यंतरी गौतमी पाटील तिच्या नृत्याच्या शैलीमुळं वादात अडकली होती. त्या वादानंतर तिनं माफी मागून असे प्रकार पुन्हा घडणार नसल्याचं देखील म्हटलं आहे. आता गौतमी पाटीलला ‘खान्देश कन्या’ म्हणून गौरविण्यात आला आहे. गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिनं माजी मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले आहेत.

काय म्हटले आहे, गौतमीच्या पोस्टमध्ये?
माजी मंत्री तथा आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देश! असं म्हटलं आहे.

गौतमी पाटील मुळ सिंदखेड्याची
गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती. असे असले तरी तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंदखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा येथे लहानाची मोठी झाली.