---Advertisement---
विशेष पर्यटन

खान्देशातील १०५१ बालकांचा हृदयस्पर्शी, संस्मरणीय बालदिन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । बालदिन हा बालकांच्या इच्छा, आकांशा आणि हुनहुन्नरी व्यक्तिमत्वाला बळ देणारा दिवस. जळगावातील माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या संकल्पनेतून २००७  मध्ये आयोजित करण्यात आलेला बालदिन कायम संस्मरणीय राहणारा आहे. राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या भेटीला खान्देशातील १०५१ नातवंडे गेली होती. जैन इरिगेशन सिस्टिम्स मुख्य प्रायोजक असलेल्या या आगळ्यावेगळ्या बालदिनाचा अनुभव मल्टी मीडिया फीचर्सचे सीईओ सुशील नवाल यांनी आज सोशल मिडियात शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे.

khandesh heart touching children day jpg webp

सुशील नवाल यांनी शेअर केलेली पोस्ट त्यांच्याच शब्दात… 14 नोव्हेंबर 2007 ची पहाट उजाडली, ती ‘मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि’च्या सर्व सहकार्‍यांच्या प्रचंड उत्साहाने आणि मनावर एकप्रकारे तितकेच दडपणही होते. कारणही तसेच होते. खानदेशातील 1051 नातवंडे आपल्या राष्ट्रपती आजींच्या भेटीसह ‘बालदिन’ राष्ट्रपती भवनात आजींसमवेत साजरा करण्यासाठी अत्यंत आतुर होते. हा संपूर्ण प्रवास अतिशय रोमांचकारी आणि प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरला. यानिमित्त आठवणींना उजाळा.

---Advertisement---

‘बालदिन, राष्ट्रपतींसमवेत राष्ट्रपती भवन येथे’ या सुंदर कल्पनेचे आयोजक म्हणून जळगावचे सौ. व श्री. जयप्रकाशजी बाविस्कर यांच्या प्रबोधन संस्थेने जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा 14 नोव्हेंबर 2007 रोजी तत्कालीन राष्ट्रपती महामहीम सौ.प्रतिभाताई देविसिंहजी पाटील (शेखावत) यांच्यासमवेत ‘बालदिन’ साजरा करावा, असे ठरविले. ‘इव्हेंट मॅनेजर’ म्हणून नियोजनाची संपूर्ण जबाबदारी टीम मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि यांच्यावर सोपविण्यात आलेली होती. या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजकत्व आदरणीय मोठेभाऊ स्व.भवरलालजी जैन, अशोकभाऊ जैन, अतुलभाऊ जैन व कुटुंबीयांसह जैन इरिगेश्न सिस्टिम्स प्रा लि ने स्वीकारलेले होते आणि म्हणूनच या संकल्पनेला ‘जैन इरिगेशन ड्रीम एक्स्प्रेस’ हे नाव दिले गेले. याचबरोबर सुरेश कलेक्शन अ‍ॅण्ड क्रिएशन्स, इशान इंडस्ट्रीज, डॉ. सुरेश बोरोले, अनुभूती स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठान, जी.एच. रायसोनी कॉलेज, जिल्हा शिक्षक संघटना, आर.आर. विद्यालय, डॉ. सुरेश श्यामराव पाटील, श्रवण विकास विद्यामंदिर, तुलसी एक्स्ट्रुजन्स, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव, रेल्वे प्रशासन, राष्ट्रपतीचे स्वीय सहाय्यक श्री.रविंद्र जाधव, डॉ.श्री.के.बी. पाटील, डॉ.नरेंद्र दोषी, श्री.रमेश कापुरे व लोकप्रतिनिधी यांसह ज्ञात-अज्ञात अनेकांचे विशेष योगदान व सहकार्य लाभले होते.

या ‘बालदिना’च्या सोहळ्यासाठी 40 हजारहून अधिक विद्यार्थ्यांमधून 1051 विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया, सर्व विद्यार्थ्यांचा तसेच प्रवासासंदर्भातल काढलेला विमा, विविध 186 परवानग्या, 17 डब्यांची स्पेशल ट्रेन, 51 शिक्षक, 15 डॉक्टर्स, 25 राखी केटरिंगचे सहकारी, 3 टेलर, नवी दिल्लीतील सफरीसाठी स्थानिक 27 बस, 42 सिक्युरिटी गार्ड, 51 मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि चे सहकारी, 24 इव्हेंट मॅनेजमेंटचे विद्यार्थी, 14 प्रसारमाध्यमांचे सहकारी, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यासह 10 ते 15 वर्षे वयोगटातील 1051 बालके (अंध, अपंग, कर्णबधिर, मूकबधिर, अनाथ यांसह) आम्ही राष्ट्रपती भवनात पोहोचल्यावर राष्ट्रपती सौ.प्रतिभाताई पाटील यांनी तेथील ‘मुगल गार्डन’ मध्ये दिलेली ‘बालदिना’ची मेजवानी (राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुगल गार्डन’ हे फक्त डिसेंबरमधील टुलीप फेस्टीव्हलसाठीच वर्षातून एकदा सार्वजनिकरित्या खुले केले जाते. मात्र, या सोहळ्याकरिता ‘मुगल गार्डन’ विशेषत्त्वाने खुले करण्यात आले होते.

वृक्षारोपणासह पर्यावरण रक्षणाची शपथ, सर्व विद्यार्थ्यांसह काढलेली सामूहिक छायाचित्रे, प्रवासादरम्यान सुंदर हस्ताक्षरापासून गायन, चित्रकला, निबंध लेखन, अंताक्षरी यांसह अनेक स्पर्धा, गमती-जमती रोमांचकारीच. यातच अचानक गायब झालेले दोन विद्यार्थी, विशेष सुविधांनी नटलेले सफदरजंग, नवी दिल्ली रेस्वे स्टेशन, डॉ.आंबेडकर भवनातील निवास व्यवस्था, वाहन व्यवस्था, संपूर्ण दिल्ली दर्शन, वेगवेगळ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्वाक्षरीतज्ज्ञ श्री.माणकलालजी अग्रवाल यांचा सक्रिय सहभाग, भारताच्या गौरवशाली इतिहासाचे प्रवासादरम्यानचे कथाकथन, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मापानुसार शिवून घेतलेला गणवेश, सकाळच्या आंघोळीनंतर चहा-नाश्तासह रात्रीच्या जेवणापर्यंतची व्यवस्था, व्यवस्थेदरम्यान केलेले व लाभलेले सहकार्य तसेच आर्थिक अडचणींसह ऐनवेळी आलेल्या संकटांवर मात करीत काढलेले मार्ग अशा अनेक घटना कोणाला इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून तर विद्यार्थ्यांना काही आठवणींच्या रूपातून संस्मरणीय करून गेल्या.

दिल्लीहून परतीच्या प्रवासानंतर जळगावात पोहोचताच फलाट क्रमांक पाचवर संबंधित मुलांच्या पालकांसह मित्र परिवार व नागरिकांकडून रांगोळ्या, पुष्पवृष्टी, बॅण्डपथकासह अनेकविध पद्धतींनी झालेल्या अप्रतिम स्वागतामुळे सर्व मुलांच्या चेहर्‍यावरून ओसंडणारा आनंद व सरतेशेवटी निर्विघ्नपणे अगदी निवड प्रक्रियेपासून विद्यार्थ्यांना घरी साभार पोहोचविण्यापर्यंत संपन्न झालेला हा ‘बालदिना’चा सोहळा आमच्यासाठी ‘माइल स्टोन’च ठरला. अद्याप तरी याची पुनरावृत्ती देशभरात दुसर्‍यांदा झालेली नाही, हे मात्र विशेष!

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---