जळगावकराना अनुभवता येणार सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच खाद्य पदार्थांची मेजवानी

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या वतीने “खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन – २०२६” या भव्य प्रदर्शनाचे आयोजन दि. ०१ ते ०५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक, जळगाव येथे करण्यात आले आहे. दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री –यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमास विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

खान्देशातील कृषी परंपरा, लोकसंस्कृती, पशुधन आणि ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन घडविणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनात कृषी व पशुप्रदर्शन, महिला बचत गट उत्पादनांचे विक्री-व-दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच खान्देशी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
प्रदर्शनात कृषी निविष्ठा, अवजारे, तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती, हस्तकला व गृहउद्योग उत्पादनांचे आकर्षक दालन, शेतकरी मार्गदर्शन सत्र, उद्योजकता विकास व महिला सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच पारंपरिक लोककला, लोकनृत्य, लोकसंगीत आणि अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
प्रदर्शनाच्या कालावधीत दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात आली असून, यामध्ये नामवंत गायक, अभिनेते, नृत्यकलाकार, लोककलावंत यांचे कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये पोवाडा, लावणी, कविसंमेलन, लोकनाट्य, शाहिरी कार्यक्रम व विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश आहे.
खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण परिचय करून देणारे हे प्रदर्शन नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.






