जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । राज्यातील माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे हे सध्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे चर्चेत आहेत. माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी याबाबत आक्षेप नोंदविल्यानंतर इतरही अनेक जण पुढे आले होते. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दिव्यांग मंडळाने त्यांना ६०टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले असून वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी हे प्रमाणपत्र वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच खडसेंना अपंगत्वाचे तात्पुरते प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला आहे. दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून तपासणीसाठी खडसे स्वतः जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गेले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी सर्वात अगोदर एकनाथराव खडसे यांच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र माध्यमांसमोर आणत आक्षेप घेतला होता. त्यानंतर खडसेंचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनीही खडसेंच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे. मालपुरे यांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची देखील मागणी केली आहे. खडसेंच्या दिव्यांग प्रमाणपत्रामागे काही जण ईडीच्या चौकशीचा देखील संबंध जोडत आहे. चौकशीपासून बचावासाठी त्यांनी हे केल्याचे बोलले जात आहे.
खडसेंनी स्वतः सादर केले तपासणी अहवाल
जळगाव लाईव्हने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपअधिष्ठाता व दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ.मारोती पोटे यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. डॉ.पोटे म्हणाले की, एकनाथराव खडसे यांच्या सर्व विविध वैद्यकीय तपासण्यांच्या अहवालांच्या आधारेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळाच्या तज्ञ डॉक्टरांनी त्यांना ६० टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यासाठी खडसेंनी स्वतः दिव्यांग मंडळात तपासणीसाठी हजेरी लावून त्यांच्याकडे असलेले तपासणी अहवाल सादर केले. त्याची प्रत्यक्ष पडताळणी करून दिव्यांग मंडळाच्या डॉक्टरांनी त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र इश्यू केले आहे, अशी माहिती डॉ.पोटे यांनी दिली आहे.
खडसेंना ‘या’ आधारे मिळाले प्रमाणपत्र
एकनाथराव खडसे यांना सर्व्हायकल स्पॉंडिलिसिस तसेच नी-जॉईंट प्रॉब्लेममुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीचे सर्व अहवाल त्यांच्याकडे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, त्यांना दिलेले प्रमाणपत्र हे टेम्पररी बेसिसवर असून ते एका वर्षाच्या कालावधीसाठी लागू असेल. औषधोपचाराने पुढे त्यांचे अपंगत्व कमी होऊ शकते किंवा वाढू पण शकते. त्यावेळच्या वैद्यकीय तपासणीत काय निदान होते, त्यावर ही बाब अवलंबून असेल, असेही डॉ.पोटे यांनी सांगितले. क्रोनिकल न्यूरोलॉजिकल कंडिशनमुळे बऱ्याच जणांना अशा प्रकारचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे फक्त खडसेंना हे कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे, असेही डॉ. पोटे यांनी सांगितले. शासनाने २०१८ च्या शासन निर्णयानुसार २१ प्रकारच्या आजारांमध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक आजार त्यात समाविष्ट केले आहेत, असेही ते म्हणाले.