जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३ । कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून यात अनेक बड्या नेत्यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. दरम्यान, निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली असून या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. तर काँग्रेस राज्यात सत्ता स्थापन करताना दिसत आहे. Karnataka Assembly Election Results 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत असून आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल बॅलेटची मतमोजणी अजूनही सुरू आहे. निवडणुकीच्या सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 200 हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत.
यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. बेळगावमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कल सारखे कमी जास्त होत आहेत. मात्र, सध्या मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.