जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२५ । जामनेर तालुक्यातील करमाड-पळासखेडा येथील सुमारे ३ किमी लांबीच्या शिवरस्त्यापैकी सुमारे ०.५ किमी अंतर अतिक्रमणग्रस्त होते. या अतिक्रमणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी मोठा अडथळा येत होता.

ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा संबंधित शेतकऱ्यांना सामंजस्याने रस्ता मोकळा करण्यासाठी विनंती केली. मात्र, दोन शेतकऱ्यांनी मोजणी होईपर्यंत रस्ता न खुला करण्याची भूमिका घेतल्याने रस्ता मोकळा होऊ शकला नव्हता.
या पार्श्वभूमीवर दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी उप अधीक्षक, भूमी अभिलेख जामनेर यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत, पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करून संबंधित अतिक्रमण हटवण्यात आले व रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला.या कारवाईमुळे सुमारे ७० ते ९० शेतकऱ्यांना रस्त्याचा थेट लाभ मिळणार असून शेतीमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पुढाकार घेतला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी नितीन ब्याळे, रवींद्र घुले, ग्रामपंचायत अधिकारी, भूमी अभिलेख कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवरस्ता खुला झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, तालुक्यातील इतर अडथळा आलेल्या पानंद रस्त्यांसाठीही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.