⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | वॉटरग्रेसचा मलिदा खातंय कोण? सत्ताधारी, विरोधक कि दुसरेच कुणी?

वॉटरग्रेसचा मलिदा खातंय कोण? सत्ताधारी, विरोधक कि दुसरेच कुणी?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर मनपा हद्दीतील कचरा संकलन करण्याचा मक्ता गेल्यावर्षी मोठा विरोध पत्करून वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला होता. ‘स्वच्छ शहर, हिरवे शहर’ या ब्रिदवाक्याला साजेसे शहर पाहायला मिळणार अशी अपेक्षा लावून असलेल्या जळगावकरांच्या अपेक्षा काही महिन्यातच धुळीस मिळाल्या. मध्यंतरी तर नगरसेवकांना वॉटरग्रेसकडून पाकिटे मिळत असल्याची चर्चा बाहेर आल्याने आणि त्यावर कुणीही खुलासा न केल्याने आणखीनच शिक्कामोर्तब झाले. वॉटरग्रेसबद्दल ओरड सर्वच करताय राष्ट्रवादीने तर तत्कालीन महानगराध्यक्ष असताना आणि आता विद्यमान महानगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. स्वच्छता होत नसल्याने सर्वांचाच विरोध असताना ठोस कारवाई कशी होत नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे.

जळगाव शहरातील नागरिक स्वच्छतेच्या बाबतीत कायमच कमनशिबी राहिले आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत शहराला चांगले नामांकन मिळत असले तरी ती स्वच्छता होते कुठे हे मात्र दिसत नाही. मनपात दिसायला मनुष्यबळ आहे पण प्रत्यक्षात सेवा बजावताना बहुतांश चेहरे दिसत नाही. काही वर्षापूर्वी जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर असताना त्यांनी मनपा आयुक्ताचा प्रभारी कारभार पाहत धडक मोहीम राबवली होती. दांडी बहाद्दर आणि वशिलेबाज कर्मचाऱ्यांनी त्यांनी थेट नारळ दिले होते. नुकतेच शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी देखील नगरसेविका पती काम करीत नाही म्हणून आरोप केला होता. मनपात असे कितीतरी चेहरे आहेत.

कर्मचारी नसल्याने जळगाव शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी वॉटरग्रेस कंपनीला सोपविण्यात आली होती. कोटीच्या कोटी उड्डाणे असलेला हा मक्ता देताना मोठा विरोध झाला होता. मनपात भाजपची सत्ता असल्याने सर्वानुमते त्याला मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यावर काही महिन्यातच नागरिकांसह नगरसेवकांची ओरड सुरु झाली. मनपात एकही नगरसेवक नसलेली राष्ट्रवादी काँग्रेस देखील विरोध नोंदवायला रस्त्यावर उतरली. मनपावर मोर्चा आला आणि काही दिवसांनी पुन्हा प्रकरण शांत झाले. मनपात सत्तांतर झाले आणि शिवसेनेने भगवा फडकावला.

शिवसेनेचा भगवा फडकला खरा पण वॉटरग्रेसकडून चांगले काम करून घेण्याचे त्यांना देखील जमले नाही. मध्यंतरी तरी वॉटरग्रेसकडून नगरसेवकांना दरमहा पाकिटे मिळत असल्याचा चर्चा बाहेर आल्या होत्या. बीएचआर प्रकरणात देखील एका संशयिताच्या कार्यालयातून हस्तगत केलेल्या कागदपत्रात वॉटरग्रेसच्या काही कागदपत्रांचा समावेश होता आणि हिशोबाची डायरी सापडली असल्याची माहिती समोर आली होती. माध्यमांनी देखील वृत्त प्रकाशित केल्याने सोशल मीडिया चॅट, व्हाट्सअँप कॉल करणारे देखील यामुळे घाबरले होते.

काही दिवसात पुन्हा सर्व शांत झाले. सोशिक जळगावकर नेहमीप्रमाणे कचऱ्याची घाण सहन करू लागले. गावभर घंटागाडी फिरवत ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन करणारे वॉटरग्रेस डंपींग ग्राउंडला मात्र एकाच ठिकाणी कचरा उपसते. घनकचरा प्रकल्पाचा अद्याप ठिकाणाच नसल्याने परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून त्रास सहन करीत आहे. वॉटरग्रेस बद्दल केवळ सत्ताधारी, विरोधक, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच नाराज नसून इतर देखील काही संघटना, माहिती अधिकार कार्यकर्ते, समाजसेवक नाराज आहेत. सर्वांनी तसे बोलून दाखविले, निवेदने दिली तरीही परिस्थिती जैसे थे आहे. वॉटरग्रेसविरुद्ध बोला आणि काही दिवसात शांत व्हा, नेमकं हीच वृत्ती संशयाला वाव देते.

राष्ट्रवादी काँग्रेसने तर आजवर दोन वेळा वॉटरग्रेसविरुद्ध आंदोलन केले आहे. अनेकवेळा नगरसेवक, नागरिक आणि समाजसेवकांनी वॉटरग्रेसकडून कचरा संकलन आणि मोजमापमध्ये कशाप्रकारे उल्लंघन होते हे अनेक वेळा निर्दशनास आणून दिल्यानंतर देखील ठोस कारवाई होत नसल्याने नेमकं पाणी कुठे मुरते हेच कळत नाही. सुरुवातीच्या काळात तर दंड, ठेका रद्द करण्याच्या हालचाली जोरदार झाल्या मात्र नंतर सर्व थंडबस्त्यात गेले. अधिकारी, सत्ताधारी, विरोधक की इतर कुणाचे हात वॉटरग्रेसच्या मलिद्याने माखलेले आहेत? हा मोठा प्रश्न आहे. वॉटरग्रेसकडून काम करवून घेणे शक्य नाही कि करवून घेतले जात नाही, असा प्रश्न सोशिक जळगावकरांच्या मनात आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.