कोल्हापुरातून पहिली महिला आमदार होण्याचा जयश्री जाधव यांना मिळाला मान
भाजपाचे सत्यजित कदम यांचा सुमारे १८ हजारहून अधिक मतांनी पराभव
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला असून कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान त्यांना आता मिळाला आहे. भाजपाचे सत्यजित कदम यांचा सुमारे १८ हजारहून अधिक मतांनी या निवडणुकीत पराभव झाला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज २६ फेऱ्यांमध्ये पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
यानिवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडून होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचार केला होता. महाविकास आघाडीच्या विजयाने कोल्हापूरसह राज्यभरात मोठा जल्लोष सुरु झाला असून भाजपचे कमळ पुन्हा कोमेजले आहे.