जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच जामनेर येथील तलाठ्याला ५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. वसीम राजू तडवी (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकार?

तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी असून त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी जामनेर शिवारात दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते. या प्लॉटची खरेदी केल्यानंतर त्यावर स्वतःचे आणि पत्नीचे नाव अधिकार अभिलेखात तसेच ७/१२ उताऱ्यावर लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय गाठले होते. ही फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी वसीम तडवी याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी जळगाव एलसीबीने तक्रार केली होती. यांनतर तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने ७ जानेवारी रोजीच पडताळणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.यावेळी पंच साक्षीदारांसमोर तलाठी तडवी याने ५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडअंती ४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. सापळा रचला असताना, तक्रारदाराकडून ४ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने वसीम तडवी याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई?
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पर्यवेक्षण व तपास योगेश ठाकूर (पोलीस उपअधीक्षक, एसीबी जळगाव), सापळा अधिकारी: हेमंत नागरे (पोलीस निरीक्षक), बाळू मराठे, भूषण पाटील या अधिकाऱ्यांचा समावेश होता.


