जळगाव लाईव्ह न्यूज । श्री शिवरत्न प्रतिष्ठान निर्मित सुमारे पावणेदोनशे कलाकारसंख्या असलेले “राजा रयतेचा” हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत त्यांच्या जीवनावर आधारित महानाट्य आहे. मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक तसेच जळगावच्या स्थानिक कलाकारांना घेऊन हे नाटक २ वर्षांपूर्वी निर्मित करण्यात आले.

स्वर्गीय शिवरत्न दादा नेवे यांनी या महानाट्याचे लिखाण केले असून हास्यजत्रा फेम हेमंत पाटील यांनी दिग्दर्शन केले आहे. निर्मितीची धुरा जयवर्धन नेवे यांनी सांभाळत श्री शिवरत्न प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी या महानाट्याच्या निर्मितीसाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. खान्देश तसेच विदर्भात अनेक प्रयोग यशस्वी झाल्यावर आता या नाटकाचे सलग ५ प्रयोग कोकणभागातील शिरगाव बीच पालघर येथे १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान संपन्न होणार आहे.

भवानीमातेच्या २० फूट उंचीच्या मुर्तीसह ३० ते ४० फूट उंचीचा किल्ल्यांची थीम असलेला भव्य सेट, घोड्यांसह अंगावर काटा आणणारे युद्धदृश्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा अशी या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत. कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित ग्लोबल कोकण या महोत्सवात जळगावच्या या महानाट्याला सादरीकरणाची संधी म्हणजे जळगावकरांचा बहुमानच म्हणावा लागेल. जर स्थानिक कलाकारांना यात काम करण्याची संधी हवी असेल तर उत्सुक कलाकारांनी 9890006193 या क्रमांकावर संपर्क साधावा.








