५ वर्षात ७२ विदेशींना मिळाले भारतीय नागरिकत्व, ३ विदेशी विद्यार्थी जळगावात घेतात शिक्षण
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । फॉरेनची पाटलीन हा शब्द मराठमोळ्या माणसाला काही नवीन नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या फॉरेनची पाटलीन या चित्रपटाने विदेशी मुलगी सून म्हणून मराठी कुटुंबात आल्याचे सर्वांनी त्यात पाहिले आहे. सोशल मीडियाच्या जगात कुणाचे सूत कुठे जुळेल काही सांगता येत नाही. ऑनलाईन प्रेमाच्या आणाभाका घेतल्यावर आणि विदेशात शिक्षण, नोकरीनिमित्त गाठीभेटीतून प्रेम फुलल्यावर त्या नात्याला भारतात लग्नाच्या बंधनात अडकविले जाते. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात ५ विदेशी मुली वधू म्हणून जळगावकर सून झाल्या आहेत. ५ पैकी एकीने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे.
विदेशातून भारतात आणि विशेषतः जळगावात आलेल्या नागरिकांची नोंद जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट, व्हिसा शाखेत होत असते. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक अनिल मालचे आणि एक सहकारी या विभागाचे काम पाहत असतात. विदेशातून आलेल्या नागरिकांचा व्हिसा पडताळणी करण्याची जबाबदारी या विभागावर असते. गेल्या काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेता दर महिन्याला दोंन परदेशी व्यक्ती जळगावात येत असतात, त्यापैकी बहुतांश नागरिक हे विदेशात स्थायिक झालेले जळगावकर असून कुटुंबियांच्या भेटीसाठी ते इकडे येतात.
५ वर्षात ७२ विदेशी नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व
भारतातील हजारो सिंधी समाजबांधवांचे नातेवाईक आजही पाकिस्तानमध्ये वास्तव्याला आहेत. पाकिस्तानात देखील सिंधी समाज मोठ्याप्रमाणात आहे. जळगावात सध्या २९० पाकिस्तानी सिंधी नागरिक वास्तव्याला असून ते दरवर्षी आपल्या व्हिसाची मुदत वाढवून घेतात. दरवेळी त्यांना दोन वर्षासाठी मुदतवाढ दिली जाते. गेल्या पाच वर्षात ७२ विदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले असून त्यापैकी बहुतांशी नागरिक पाकिस्तानी सिंधी समाज बांधव आहेत. यावर्षी ४ नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. दरवर्षी कितीतरी नागरिक प्रशासनाकडे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल करीत असतात.
जळगाव जिल्ह्यात दोन वर्षात आल्या ५ विदेशी वधू
जिल्ह्यात दरवर्षी पार पडणाऱ्या विवाह सोहळ्यात शक्यतो वधू-वर महाराष्ट्रीयनच असतात काही वेळेस ते भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील रहिवासी असतात असे होते. विदेशातील वर किंवा विदेशी वधू असे क्वचितच घडते. जळगाव जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात ५ विदेशी वधू सून म्हणून आल्या आहेत. पाचपैकी १ रशिया, १ दक्षिण आफ्रिका, १ येमेन, १ इथियोपिया आणि १ इंडोनेशिया येथील वधू आज जळगावकर झालेली आहे. इंडोनेशियाच्या वधूने भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज देखील केलेला आहे. तसेच पोर्तुगल येथील एक तरुण देखील लग्न करून भारतात स्थायिक झाला असून त्याने देखील भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. जळगावात ३ येमेनचे विद्यार्थी देखील जळगावात शिक्षण घेत आहेत.