⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावकर, आम्हाला माफ करा : नगरसेवकाने मागितली माफी

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । जळगाव शहर मनपाच्या महासभेत बुधवारी झालेला गोंधळ सर्वांना माहितीच आहे. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर सर्वत्र टीका होत असल्याने जळगावातील एका नगरसेवकाने नागरिकांची माफी मागितली आहे. नगरसेवक नितीन बरडे यांनी सोशल मिडियात एक पोस्ट व्हायरल केली असून त्याची चर्चा आहे. नगरसेवक नितीन बरडे यांची संपूर्ण पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे..

जळगाव महानगर पालिकेच्या महासभेत काल गोंधळ घातला गेला. हा गोंधळ विकास कामे मंजुरीसाठी नव्हता. वैयक्तिक हेवेदावे यासाठी होता. कोण काय बोलले आणि कोणी काय केले ? याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात आले आहेत. मी सुद्धा मनपा सभागृहाचा सदस्य असून काल झालेल्या प्रकाराबद्दल जळगावकरांची मी जाहीर माफी मागतो. आम्ही विकास कामांसाठी एकत्र येत नाही तर दुसऱ्याच्या पदाला हरकती घेऊन भांडतो. ही नवी संस्कृती सभागृहात निर्माण होते आहे. याचा मला खेद असून शहरासाठी काहीही न करू शकत असल्याबद्दल खंत आहे.

मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे, नगर विकास मंत्री मा.एकनाथराव शिंदे, पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेला आता १२० कोटी रूपयांवर विकास निधी मिळालेला आहे. या निधीतून शहर विकासाचे अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. या प्रस्तावांना मंजुरी देताना सत्ताधारी किंवा विरोधक असा भेदभाव नको. प्रत्येक विकास काम हे नागरिकांसाठी आहे. ते वेळीच मंजूर व्हायला हवे. निधी वेळेवर खर्च व्हायला हवा. पण आताचे विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. विकास कामे होऊनये ही त्यांची इच्छा आहे. महानगरपालिकेत मागील अडिच वर्षे विरोधक सत्तेत होते. त्यांना पूर्वीच्या युती सरकारने दिलेला व आताच्या मविआ सरकारने दिलेला निधी खर्च करून विकास कामे करता आली नाही.

आता पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील हे महानगर पालिकेला वाढीव निधी मिळवून देत असून तो वेळेवर खर्च झाला पाहिजे. अन्यथा मार्च २०२२ मध्ये निधी परत जाईल. विरोधक स्वतःचा स्वार्थ साधायला फुटकळ विषयांवर विरोध करीत आहे. अशावेळी काहीही काम होत नसेल तर जळगावकरांची माफी मागणे हाच पर्याय उरतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मी विरोधकांना विनंती करतो की, महानगर पालिका सभेत विकास कामांचे ठराव मंजूर करा. तुमचा विधायक विरोध नोंदवा. गरज वाटली तर मनपा आयुक्त, नाशिकचे विभाग आयुक्त, नगरविकास मंत्री, उच्च न्यायालयात तक्रारी करा. कायद्याची भांडणे तेथे करा. पण सभागृहात इतर सदस्यांना धक्काबुक्की करू नका. शहरातील चार लाखावर मतदारांनी आपल्याया विश्वासाने निवडून दिले याचे भान राखा. सभागृहाची व स्वतःची प्रतिष्ठा जपा.
जोपर्यंत नगरसेवक वर्तन सुधारत नाहीत, तोवर जळगावकर माफ करा.. :  नितीन बरडे, नगरसेवक (शिवसेना)