जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून जनजागृती करूनही लोक बळी पडत आहे. यातच मुलीला डायरेक्ट तहसीलदार बनविण्याचे आमिष देऊन जळगावच्या नेहरू नगरातील ५३ वर्षीय महिलेला एका महिलेने १८ लाख ८९ हजार रूपयात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना कशी?
नेहरू नगरात कल्पना आत्माराम कोळी या पती, मुलगा, सुनेसह वास्तव्यास आहेत. विवाहित मुलगी ही खंडेरावनगरात राहते. दोन वर्षांपूर्वी कल्पना यांची हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात ज्योती अशोक साळुंखे नामक महिलेशी विश्वास संपादन करण्यासाठी ओळख झाली. नंतर अधून-मधून दोघे भेटत असत. एकेदिवशी ज्योती हिने कल्पना यांना तुमच्या मुलीला शासकीय कार्यालयात तहसीलदार पदावर नोकरी लावून देते सांगून वेगवेगळ्या लोकांशी कॉलवर सुध्दा बोलणे करून दिले; परंतु या कामासाठी काही पैसे द्यावे लागतील, असेही तिने सांगितले.
अखेर ज्योती हिने पैसे मागितल्यावर ५ ऑगस्ट ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान एकूण ४ लाख २२ हजार रूपये दिले. नंतर ज्योती हिने पुन्हा कल्पना यांना कॉल करून तुमचे काम होणार आहे, त्यासाठी आणखी पैसे द्यावे लागतील सांगितले. केल्यावर आता निवडणूक कल्पना यांनी त्यांच्याजवळील ११० ग्रॅमच्या सोन्याचे दागिने ज्योती हिला दिला. काही दिवसानंतर कल्पना यांनी ज्योती हिला मुलीची नोकरी कधी लागेल अशी विचारणा असल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर सरकारी योजनेतून मुलीला पैसे कमवून देण्याचे आमिष पुन्हा तिने कल्पना यांना दाखविले. सरकारी योजनेतून शिलाई मशिन, चक्की, वॉरोना मशिन, गॅस कनेक्शन, मिक्सर, पेटी मिळवून देण्याचे आमिष दाखवून कल्पना यांच्या मुलीच्या घराच्या परिसरातून ५६० लोकांकडून ३ लाख ५१ हजार रूपये गोळा करून घेवून गेली.
माझी पोहोच वरपर्यंत, पैसे देणार नाही
अनेक दिवस उलटून सुध्दा ज्योती ही नोकरीबाबत काही बोलत नाही म्हणून कल्पना व त्यांची मुलगी वैशाली या ज्योती हिच्या घरी गेल्या. आमचे पैसे परत करा अशी मागणी केल्यावर ज्योती हिने वाद घालत तुमचा एकही रूपया मी देणार नाही, माझी वरपर्यंत ओळख आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशी धमकी दिली. अखेर कल्पना यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानुसार नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून व लोकांचे पैसे घेवून सुमारे १८ लाख ८९ हजार रूपयात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास रवींद्र तावडे हे करत आहे.